गावाविषयी माहिती
पिंपळस रामाचे हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ७,८५१ आहे. आज मितीस गावामध्ये एकूण ६२२२ मतदार असून पुरुष मतदार ३२७६ व स्त्री मतदार २९४६ आहेत.
गावाची मुख्य ओळख म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपळस गावास पिंपळस (रामाचे) या नावाने ओळखले जाते.
पिंपळस गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे ७, आरोग्य उपकेंद्रे २, तलाठी कार्यालय १, पोष्ट ऑफिस २, विविध कार्यकारी सोसायटी १, व्यायामशाळा ३ अशी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच १५ मोठी मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
तसेच गावामध्ये सेन्ट्रल बँक १, NDCC बँक २, व इतर संस्था कार्यरत आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, कापूस व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष व ऊस या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
पिंपळस रामाचे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पिंपळस (रामाचे) गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे.
पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १५ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
पिंपळस रामाचे गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.